भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Foto

 वैजापूर: मुंबई नागपूर महामार्गावरील रांजणगाव पोळ परिसरातील गोपाल हॉटेल जवळ भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. विजय फुलसिंग जारवाल (वय 32 वर्षे) रा. जमनवाडी असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, विजय हा काल औरंगाबाद येथे कामानिमित्त आला होता. रात्री त्यांना औरंगाबाद येथे उशीर झाला होता. रात्री बारा वाजेच्या सुमारास गावाकडे दुचाकी क्रमांक एमएच २०, बी यु ५९४ वरून घराकडे निघाले. घराकडे जात असताना रांजणगाव पोळ जवळील गोपाल हॉटेल जवळ समोरून आलेल्या भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात विजय हे जागीच ठार झाले. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनी अपघाताची माहिती शिल्लेगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विजय यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत केली या अपघाताची नोंद शिल्लेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.